“अर्रर्रर्र, काय खरं आहे या जिओचं! नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने! इकडे एक पिक्चर पण डाऊनलोड करायचं काम चालले होते…”, आपला डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्जिंग ला लावता लावता दीपक पुटपुटत होता.

“आता रात्री 12 पर्यंत वाट बघावी लागणार आहे पुन्हा 1 GB साठी. तोवर काय काम करायचं आता? काल आज्या कडून आणलेलं बँकिंग चं पुस्तक वाचायचं कि सागर कडून आणलेला पिक्चर बघायचा? “, असा विचार चालूच होता, लगेच आईने आरोळी देऊन सांगितलं कि रानात गेलेल्या दादांना चारा आणू लागायला जा म्हणून.

“अभ्यास करायचा तर कंटाळा येतोच, आता तेवढा चारा आणून टाकू एकदाचा घरी आणि बसू पिक्चर बघत 2-3 तास, नंतर थोडासा अभ्यास करू आणि 1 GB इंटरनेट येऊन जाईल मग 12 ला. ”
असा पूर्ण दिवसाचा प्लान करून दीपक ने खुळखुळ आवाज करणारी 4S गाडी काढली आणि झिंग झिंग झिंगाट गाणे म्हणत, आर्चीचे स्वप्न बघत निघाला शेताकडे.

6-7 वर्षापूर्वी असं ऊस आणायला शेतामध्ये जावे लागायचे. पाउस पाणी भरपूर होता, जनावरे पण भरपूर होती घरी. नंतर काळ बदलत गेला, तसं उसावरून गव्हावर पिक आलं. नेमकं गव्हाचं पिक होईल इतकंच पाणी असायचं त्या वेळी. नंतर पाणी प्यायची पण पंचाईत.
पुढे 3-4 वर्षापूर्वींची परिस्थिती बघितली तर शेतामध्ये ज्वारी दिसायला लागली. पुन्हा पुढे आल्यावर 2-3 वर्षांपूर्वी ज्वारीचं बाटूक झालं.

आता यंदा फुटाफुटाच्या अंतरावर उगलेलं बाटूक आणि अर्ध्या वाटणीत हरभरा असं पिक आहे. यातच मानणार समाधान बाकी काही नाही..!

दीपक वडिलांना दादा म्हणतो. तो पाचवीला होता तेव्हापासून वडील आजारी पडले, पाऊस पडायचा कमी झाला. परिस्थिती खालावत गेली आणि दारिद्र्य वाढत गेले.

रोजाची कामे करून आई वडिलांनी शिकवलं, Graduation पूर्ण केलं. आता तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. खूप साऱ्या परीक्षा देऊनही अजूनपर्यंत यश काही मिळाले नाही.
विश्वास नांगरे पाटलांचे आणि भरत आंधळेंचे भाषण ऐकून मनात विश्वास येतो, अंगावर पुन्हा शहारे येतात आणि अभ्यास करायची प्रेरणा मिळते, असे दीपकचे मत आहे.

एकतर भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही आणि English चा प्रॉब्लेम असल्यामुळे शहरात नोकरीसाठी जाता येत नाही. मग शेवटी पर्याय एकच उरला, स्पर्धा परीक्षा!

एका ठिकाणी नोकरी मिळायचीही आशा होती, पण 6 लाखांची लाच मागितल्यामुळे दीपक ने तो विषय सोडून दिला.

2 बहिणींचे लग्न आणि नुकतेच बांधलेल्या घरामुळे जवळजवळ 8 ते 10 लाखांचे कर्ज डोक्यावर आहे. अशाही परिस्थितीत खचून न जाता अभ्यास करायची उमेद आहे अजून दीपकमध्ये.

गेल्यावर्षी गावातील दीपकच्या एका मित्राने JCB घेतला, त्याने 11 वी नंतरच्या शिक्षणाला रामराम ठोकला होता. JCB ने केलेल्या बिझनेस मधून तो आता 13 लाखांचा बंगला बांधत आहे.
2 ते 4 वर्षात व्यवसायामध्ये इतका जम बसलाय कि आता Graduation न केल्यामुळे काही समस्या अजूनतरी आल्या नाहीत असे त्या मित्राचे मत आहे.

विश्वास नांगरे पाटलांचे भाषण त्यानेही ऐकले होते, पण आपल्यासारख्यांचे हे काम नाही म्हणून त्याने तिथच विषय थांबवला होता.
दीपक आशावादी आहे अजूनही. पण तरीही नकळत संशयाची पाल त्याच्या मनात कुजबुजते कधीकधी, कि आपल्या काही मित्रांचे लग्न होउन त्यांना मुले झालीत, मग या स्पर्धा परीक्षा तर देतोय आपण पण घरचं सगळं काम बघून आपल्याला उरलेला वेळ अभ्यासाला द्यावा लागतोय.
पुण्याला जाऊन शिक्षण घ्यावे, तर तशी परिस्थिती नाही.

मग मी शिकतोय म्हणून माझं चुकतंय? कि आईवडिलांनी शिकवलं म्हणून त्याचं चुकलं? कि सध्याची शिक्षणपद्धती चुकीची आहे?
चुकतंय कुणाचं नेमकं?

कुणाला देणार दोष?

– अमित कदम
9552015542
Director of FLYMIT InfoTech Pvt. Ltd.

Responses

  1. विचार करण्यासारखा विषय आहे हा….पण आपण जर याला त्याला दोष देत राहिलो तर काही तथ्य नाही…अर्थात शिक्षण किंवा शिक्षण पध्दती ला दोष देत बसलो तर आपल्या भावी आयुष्यात घडणाऱ्या किंवा आपण घडवून आणत असलेल्या गोष्टींना आणखी वीलम्ब होऊ शकतोच की….आणि कुणीतरी बदल घडवून आणेल आणि मग बदल होईल….अशी आशा बघण्यात चाललेला वेळ दवडन्यापेक्षा आपण आपण तर सहज बदलू शकतो की…

  2. प्रश्न योग्य उपस्तित केलाय पण लेखकाने वाचकांना संभ्रमित केलय. ही कथा एका सकारात्मक किंवा नकारात्मक शेवटात संपायला हावी होती एक वाचक म्हणून संभ्रम कायम राहतो आणि लिहन्याचा उद्देश फक्त एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा नकोच
    गावाकडचे वर्णन आणि बदलती परिस्थिती समर्पक शब्दात मनाला भिडते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *